- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘किंगफिशर एअरलाइन्स’साठी सरकारी बँकांकडून घेतलेले सुमारे ९,००० हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्याचे ब्रिटनमधून भारतात प्रत्यार्पण दोन्ही देशांमधील करारातील एका अटीमुळे कठीण ठरू श्केल, असे संकेत सरकारने बुधवारी संसदेत दिले.आरोपीचे ज्या कारणासाठी प्रत्यार्पण करायचे आहे तो दोन्ही देशांच्या कायद्यानुसार फौजदारी गुन्हा असायला हवा, अशी भारत व ब्रिटन यांच्यातील करारात अट आहे. म्हणजेच बँकांचे कर्ज बुडविणे हा भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही गुन्हा आहे, असे भारत दाखवू शकला तरच मल्ल्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकेल.ब्रिटनमध्ये बँकांचे कर्ज बुडविणे हा फौजदारी गुन्हा नाही तर तो एक दिवाणी स्वरूपाचा प्रमाद आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात अडचण येऊ शकते का, या एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी उभय देशांमधील प्रत्यार्पण करारात अट असल्याचे कबुल केले.मात्र असे असले तरी सरकार या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष देत आहे व ब्रिटिश न्यायालयाचे समाधान करून प्रत्यार्पण यशस्वी व्हावे यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करत आहे, अशी खात्री जनरल सिंग यांनी दिली. वेस्टमिन्स्टर येथील दंडाधिकारी न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी डिसेंबरपासून नियमित सुनावणी होणे अपेक्षित आहे.मल्ल्याच्या जामिनाच्या अटीप्रत्यार्पणाचे प्रकरण हाती घेण्याआधी लंडनमध्ये मल्ल्याला औपचारिक अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. सरकारतर्फे मल्ल्याच्या जामिनाच्या अटींची माहितीही संसदेत दिली गेली. त्यापैकी काही प्रमुख अटी खाली नमूद केल्या आहे...- रद्द केलेला भारतीय पासपोर्ट पोलिसांकडेच राहिल.- लंडनमधील दिलेल्या पत्त्यावरच वास्तव्य करावे लागेल.- ब्रिटन सोडून बाहेर जाता येणार नाही.- मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करून ‘आॅन’ स्थितीमध्ये अहोरात्र जवळ बाळगावा लागेल.- ६.५० लाख पौंडांचा व्यक्तिगत बॉण्ड द्यावा लागेल.
विजय मल्ल्या भारतामध्ये येणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 4:32 AM