ऑनलाइल लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला 10 जुलैला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेला विजय माल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर मुंबईच्या विशेष न्यायालयाने माल्याला फरार म्हणून घोषित केले आहे. तसेच माल्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालय 10 जुलैला विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा अवमान आणि डिएगो व्यवहारातून मिळालेल्या 40 मिलीयन यूएस डॉलरबद्दल निकाल राखून ठेवत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 9 एप्रिल रोजी म्हटले होते. मल्ल्याला डिएगो करारातून मिळालेले 40 मिलियन यूएस डॉलर म्हणजे सुमारे अडीचशे कोटी सर्वोच्च न्यायालयाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात केंद्र सरकारला मदत होणार आहे.डीएगो डिलमुळे मिळालेला पैसा मुलांच्या खात्यात जमा करुन, त्याद्वारे एका ट्रस्टची स्थापना केल्याचा दावाही बँकांनी केला आहे. याप्रकरणी बँकाच्या मागणीबाबत सुप्रीम कोर्टाने विजय मल्ल्याला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. मात्र मल्ल्याने त्याबाबत प्रतिसाद दिला नव्हता.