नवी दिल्ली - बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. बँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे, असेही माल्या आपल्या पत्रात म्हणतो. सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने पत्रक प्रसिद्ध केले आहे. मी 15 एप्रिल 2016 रोजी नरेंद्र आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते या पत्रांना दोघांनीही उत्तर दिलेले नाही. मात्र आता काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी ही पत्रे उघड करत आहे." असे त्याने पत्रात म्हटले आहे. सर्व सरकारी बँकांचे थकीत कर्ज परत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र या प्रकरणात राजकारण घुसल्यास मी काहीच करू शकत नाही, असेही तो म्हणाला. मद्यसम्राट म्हणून ओळखला जाणारा विजय माल्या बँकांनी कर्जवसुलीसाठी प्रयत्न सुरू केल्यावर 2016 साली इंग्लंडमध्ये पसार झाला होता. तेव्हापासून त्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. मात्र माल्या आपले प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे.