'अरुण जेटली आणि विजय माल्याला चर्चा करताना पाहिले होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 09:41 AM2018-09-13T09:41:17+5:302018-09-13T09:42:00+5:30
अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना पाहिले असल्याचा दावा काँग्रेसचे नेता पीएल पुनिया यांनी केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती, असे विधान विजय माल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले आहे. विजय माल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना पाहिले असल्याचा दावा काँग्रेसचे नेता पीएल पुनिया यांनी केला आहे. तसेच, विजय माल्या देश सोडून जाण्यापूर्वी दोन दिवस आधी या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचेही पीएल पुनिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, विजय माल्याच्या विधानानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, माझी आणि विजय माल्याची भेट झाली होती. मात्र ती भेट अधिकृत नव्हती.
Arun Jaitly is lying. I saw him having prolonged meeting in Central Hall of Parliament about two days before he was allowed to escape from India. Choukidar is not only Bhagidar but also Gunahagar. @INCIndia@INCChhattisgarhhttps://t.co/VJkDk1ZCkK
— P L Punia (@plpunia) September 12, 2018
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विजय माल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.
Given Vijay Mallya’s extremely serious allegations in London today, the PM should immediately order an independent probe into the matter. Arun Jaitley should step down as Finance Minister while this probe is underway, tweets Rahul Gandhi (File pic) pic.twitter.com/s2jnkoAjZT
— ANI (@ANI) September 12, 2018
(अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले)
दरम्यान, विजय माल्याने बुधवारी लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजेरी लावली होती. विजय माल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयात हा खटला सुरू आहे. त्यावेळी, मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असे विजय माल्याने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.