लंडन- भारतीय बँकांकडून घेतलेलं कोट्यवधी रूपयांचं कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या विजय माल्याला ब्रिटन हाय कोर्टाने मोठा दणका दिला आहे. भारताच्या १३ बँकांना २ लाख पाऊंड्सची (१ कोटी ८० लाख रुपये) भरपाई देण्याचे आदेश ब्रिटन हाय कोर्टाने विजय माल्याला दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विजय मल्ल्याला भारतीय बँकांना २ लाख पाऊंड्सची भरपाई देण्याचे आदेश दिले.विजय माल्याला दिलेलं कर्ज त्याच्याकडून परत घेण्यासाठी या 13 बँका कायदेशीर लढाई लढत आहेत. गेल्या महिन्यात न्या. अँड्र्यू हेन्शॉ यांनी विजय माल्याची संपत्ती गोठविण्यासंदर्भातील निर्णय बदलायला स्पष्ट नकार दिला होता.
या प्रकरणाशी संबंधित एका कायदेतज्ज्ञांनी सांगितलं.'माल्याने बँकांना नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश कोर्टाने दिला. कुठल्याही एका रकमेवर दोन्ही पक्षांनी सहमत व्हावं, किंवा कोर्ट बँकांकडून कायदेशीर प्रक्रियेवर केलेल्या खर्चाचं आकलन करेल.कोर्टाकडून खर्चाचं आकलन करणं एक वेगळी प्रक्रिया आहे. यासाठी ब्रिटनच्या एका विशेष कोर्टात सुनावणी केली जाते. दरम्यान, माल्या बँकांना कायदेशीर खर्चाचे कमीत कमी 2 लाख पाऊंड देईल.
दरम्यान, मार्च 2016 पासून विजय मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जम्मू अॅण्ड काश्मीर बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसून, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनान्शिअल असेट रिकंस्ट्रक्शन या बँका विजय माल्याविरोधात कायदेशीर लढाई देत आहेत.