ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय माल्या यांचा भारतीय पासपोर्ट सरकारने अखेर रद्द केला आहे. तीनवेळा समन्स बजावूनही विजय माल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आता दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळविले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून आता माल्यांवर मायदेशी परतण्याचा दबाव निर्माण होईल, असा ईडीचा होरा आहे.
‘युबी ग्रुप’चे माजी अध्यक्ष माल्या हे सध्या परदेशात आहेत. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे परदेशातील त्यांचे वास्तव्य बेकायदा ठरून त्यांना मायदेशी परतणे भाग पडेल, असे मत ‘ईडी’तील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना नोंदवले होते.
दरम्यान ईडीने मल्ल्यांविरुद्ध उचललेले हे पहिले पाऊल असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढण्यासाठी ईडी लवकरच न्यायालयातही धाव घेणार आहे.
ईडीने मल्ल्यांना बजावलेल्या तिसऱ्या समन्समध्ये नऊ एप्रिलला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. मात्र, मल्ल्या हजर झाले नाहीत. ईडी ९०० कोटी रूपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळ््याचा तपास करीत आहे. मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करावा, असे आम्ही पासपोर्ट प्रशासनाला लिहिले असून अजामीनपात्र अटक वॉरंटसाठी न्यायालयात कधी जायचे याचाही आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत, असे वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याने सांगितले.