नवी दिल्ली - बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याने त्याच्याकडे असलेले संपर्ण कर्ज बँकांना परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्यामुळे सर्व उद्योग ठप्प झाले आहे. याचा फटका मल्ल्याला देखील बसला आहे. अशा स्थितीत मल्ल्याने ट्विट करून संपूर्ण कर्जफेड करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतातील आपल्या उद्योगांसाठी मुल्ल्याने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
मद्यासम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मल्ल्याने कर्ज परतफेड करण्याचा पुनरोच्चार केला आहे. मात्र बँक आणि प्रवर्तन निदेशालय आपली मदत करत नसल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि त्यामुळे लागू केलेले लॉकडाउनवरून विजय मल्ल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
विजय मल्ल्याने ट्विट करून म्हटले की, भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. याची कल्पनाही कोणी केली नव्हती. या निर्णयाचा मी सन्मान करतो. मात्र यामुळे माझ्या सर्व कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. सर्व प्रकारचे उत्पादन थांबले आहे. तरी देखील आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले नसून त्यांना मोबदला देत आहोत. अशा प्रसंगी सरकारने आम्हाला मदत करायला हवी, असं मल्ल्याने म्हटले आहे.
याआधी आपण अनेकदा संपूर्ण कर्जफेड करण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र बँका पैसा घेण्यासाठी आणि प्रवर्तन निदेशालय मदत करण्यासाठी तयार नसल्याची खंत मल्ल्याने व्यक्त केली. मल्ल्याने याआधी देखील कर्जफेड करण्याची तयारी दर्शविलेली आहे. मात्र तो भारतात परतण्यासाठी तयारी नाही. मागील चार वर्षांपासून मल्ल्या लंडनमध्ये राहात आहे. त्याच्याकडे बँकाचे ९ हजार कोटींचे कर्ज असून त्याने मार्च २०१६ मध्ये भारतात पलायन केलेले आहे.