नवी दिल्ली - बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळ काढणाऱ्या कर्जबुडव्या मद्य सम्राट विजय माल्यानं कर्ज फेडण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी उपलब्ध असलेली 13,900 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका माल्यानं 22 जूनला कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली आहे. माल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये ईडीने जप्त केलेली 1,600.45 कोटी रुपयांची स्थिर मालमत्ता, 7,609 कोटींचे शेअर्स, 215 कोटींचे फिक्स डिपॉझिट, युनायटेड स्पिरिट लिमिटेडमधील 2,888.14 कोटीचे शेअर्स आणि अन्य मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली आहे.
(विजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!')
दरम्यान, माल्यासा नव्या कायद्यान्वये फरार घोषित करून, त्यांची 12,500कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्या कायद्यानुसार, मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या’च्या आधारे ईडीने हा अर्ज करण्यात आला आहे. यानुसार, फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार कायदेपालन संस्थांना मिळाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने हा अध्यादेश आणला आहे.
ईडीच्या अर्जात माल्याच्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख केला आहे. माल्याला अप्रत्यक्षरीत्या ताब्यात ठेवलेल्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. ईडीच्या अर्जात म्हटले आहे की, जप्ती प्रस्तावित करण्यात आलेल्या मल्ल्याच्या मालमत्तांचे एकूण मूल्य सुमारे 12,500 कोटी रुपये आहे. त्यात स्थावर मालमत्ता आणि समभागांचा समावेश आहे.ईडीकडून हा अर्ज दाखल झाल्यानंतर तीन दिवसांनी माल्यानं भारतीय बँकांचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली.