ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ९ - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्यांनी तिस-यांदा सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) हुलकावणी देत गैरहजर राहिले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विजय मल्ल्या यांना तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र विजय मल्ल्यांनी यावेळीही हुलकावणी देत मे महिन्याच्या शेवटची तारीख देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मल्ल्यांना यापूर्वी दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. दुसऱ्या समन्समध्ये त्यांना २ एप्रिल रोजी ‘ईडी’च्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते आलेच नाहीत. त्यांनी हजर होण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी लेखी मागणी केली होती. पीएमएलएनुसार तीनवेळाच समन्स बजावले जाऊ शकते आणि त्या नियमाप्रमाणे मल्ल्यांना तीन समन्स देण्यात आले आहेत.
मल्ल्यांच्या कंपन्यांना स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सरकारी बँकांनी दिलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे थकलेली आहेत. यापैकी चार हजार कोटी रुपये येत्या सप्टेंबरपर्यंत फेडण्याचा सशर्त प्रस्ताव मल्ल्या यांनी गेल्या तारखेला दिला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी थोडासा सुधारित प्रस्ताव दिला होता. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा मल्यांचे हे दोन्ही प्रस्ताव आपल्याला अमान्य असल्याचे बँकांनी न्यायालयास सांगितले.