गांधीनगर : गुजरातचे भावी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी राज्यपाल ओ.पी. कोहली यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल केला. ते रविवारी दुपारी १२.४0 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे भाजपाचे प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांनी सांगितले. रूपानी यांच्या व्यतिरिक्त नितीन पटेल हेही शपथ घेणार आहेत. त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. रूपानी यांनी राज्यपालांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत भाजपाचे अनेक प्रमुख नेते होते. मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मात्र त्यांच्यासोबत गेल्या नाहीत. राज्यपालांना भेटून बाहेर आल्यानंतर राज्य प्रभारी दिनेश शर्मा यांनी सांगितले की, भाजपा विधिमंडळ पक्षाने विजय रूपानी यांची मुख्यमंत्रीपदासाठी, तर नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड केली असल्याचे आम्ही राज्यपालांना सांगितले. त्यानंतर त्यांनी शपथविधी समारंभास मंजुरी दिली. राज्यपाल भेटीच्या प्रसंगी आनंदीबेन पटेल का हजर नव्हत्या, या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याऐवजी शर्मा म्हणाले की, त्यांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा त्या हजर होत्या. ज्यांची निवड झाली तेच आज हजर होते.रूपानी आणि पटेल यांच्यासोबत अन्य कोण शपथ घेणार आहेत, या प्रश्नाचे उत्तर भाजपाने गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यावर काम चालू आहे, एवढेच शर्मा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
विजय रुपानी यांचा आज शपथविधी
By admin | Published: August 07, 2016 1:40 AM