अहमदाबाद - गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची घोषणा केली. नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती.
भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांची शुक्रवारी बैठक झाली. त्यामध्ये रुपानी यांची एकमताने मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा सरचिटणीस सरजो पांडे यांच्या देखरेखीखाली नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. या दोघांची गुजरातचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती.
सध्याची विधानसभा विसर्जित करण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री रुपानी आणि अन्य सर्व मंत्र्यांनी राज्यपाल ओ.पी.कोहली यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत रुपानी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संभाळतील.
गुजरातमध्ये भाजपाने सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा ब-यापैकी घटल्या आहेत. 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपाला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले. 2012 मध्ये भाजपाने गुजरातमध्ये 115 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. 2012 मध्ये 61 जागा जिंकणारी काँग्रेस 77 जागांपर्यंत पोहोचली.
पटेल मतदारांची नाराजी आणि आणखी दीडवर्षांनी 2019 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मोदींसारखी जनमानसाची पकड घेणा-या नेत्याची आज गुजरात भाजपाला आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गुजरातमध्ये घटलेला जनाधार भाजपाला परवडणारा नाही.
दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदीसाठी अचानक स्मृती इराणी यांचे नाव चर्चेत आले होते. स्मृती इराणी गुजरातच्या पुढच्या मुख्यमंत्री बनू शकतात अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी चालवल्या होत्या. पण स्मृती इराणी यांनी हे वृत्त फेटाळून लावले. गल्लीतीली निवडणूक असेल तर माझे नाव तुम्ही ऐकाल. संसदीय समिती याबद्दल निर्णय घेईल. मी कुठल्याही स्पर्धेत नाही असे इराणी यांनी स्पष्ट केले होते.