मुंबई- संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. राजकोट पश्चिम या मतदारसंघातून 2014 साली प्रथमच विधानसभेत जाणाऱ्या आणि मुख्यमंत्रीपदी बसणाऱ्या विजय रुपानी यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्रीपदी कोण नेमले जाईल याचा निर्ण. भाजपाचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि वरिष्ठ नेते घेणार असले तरी रुपानी यांच्या कारकिर्दीरडे लक्ष देणे आज आवश्यक आहे.2014 साली विजय रुपानी हे गुजरातच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेले. गेली चार दशके राजकारणात आणि भारतीय जनता पक्षामध्ये ते सक्रीय असले तरी ते विधानसभेत कधीही गेले नव्हते. पोटनिवडणुकीमुळे त्यांचा विधानसभेत प्रवेश झाला आणि पहिली दोन वर्षे मंत्री आणि नंतर एक वर्ष थेट मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली. सुरुवातीच्या काळापासूनच रुपानी अभाविप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. 1971 साली त्यांनी जनसंघामध्ये प्रवेश केला. मात्र 1976 साली त्यांना आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीच्या काळामध्ये जे युवा आणि विद्यार्थी नेते उदयास आले त्यामध्ये रुपानी यांचाही समावेश होतो. 1978 ते 1981 या काळामध्ये संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. 1987 साली त्यांनी राजकोट महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय पटलावर पहिला प्रवेश केला. राजकोट महानगरपालिकेत निवडून गेल्यावर ते विविध समित्यांची जबाबदारी सांभाळत राजकारणात एकेक पाऊल टाकत गेले. 1996-97 या एका वर्षासाठी ते राजकोटचे महापौरही होते. त्यानंतर 1998 साली राज्य भाजपाचे सरचिटणीस झाले. 2006 साली ते गुजरात राज्य पर्यटन मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्याच वर्षी त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. राज्यसभेची एक टर्म पूर्ण केल्यावर ते पुन्हा गुजरातच्या राजकारणामध्ये परतले. 2014 साली गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर सलग 12 वर्षे 4 महिने काम करणारे नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी निवडून गेले. त्यानंतर गुजरातच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले. गुजरात विधानसभेचे सभापती वजूभाई वाला यांना कर्नाटकच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. त्यामुळे वजूभाईंची रिक्त झालेली राजकोट पश्चिम या विधनसभेच्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विजयी झालेले रुपानी आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात परिवहन, जलपुरवठा, कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. 2016 साली ते भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्षही झाले आणि त्याच वर्षी त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. तीन दशकांहून अधिक काळ राजकोटच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या रुपानी यांनी राजकोटच्या जनतेने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले आहे. 1985 पासून राजकोटने भाजपाच्या पारड्यातच आपले वजन टाकले आहे. 1985 ते 2002 इतक्या प्रदीर्घ काळासाठी वजूभाई वाला राजकोट पश्चिममधून विधानसभेत निवडले जात असत. 2002 साली तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही पोटनिवडणुकीतून विधानसभेत गेले. त्यानंतर पुन्हा वजूभाई वाला येथे विजयी होत राहिले.
विजय रुपानी जिंकले, राजकोट पश्चिमचे लोकप्रतिनिधी पुन्हा मुख्यमंत्री होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:32 PM
तीन दशकांहून अधिक काळ राजकोटच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या रुपानी यांनी राजकोटच्या जनतेने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले आहे. 1985 पासून राजकोटने भाजपाच्या पारड्यातच आपले वजन टाकले आहे.
ठळक मुद्दे2014 साली गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर सलग 12 वर्षे 4 महिने काम करणारे नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी निवडून गेले. त्यानंतर गुजरातच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले.राजकोट पश्चिम येथे झालेल्या पोटनिवडणुकीत विजय रुपानी विजयी होऊन विधानसभेत गेले.