भारताच्या राजकारणात आज महिलांचे स्थान खूप मजबूत झाले आहे. अलीकडेच देशाला द्रौपदी मुर्मूंच्या रूपाने दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. पण, जेव्हा भारत इंग्रजांचा गुलाम होता, तेव्हाही एक स्त्री राजकीय पद भूषवत होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासोबतच त्यांनी गुलामगिरीतील भारताच्या राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना जाणून घेऊया, भारतीय महिला नेत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी. त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या होत्या.
विजयालक्ष्मी पंडित कोण?विजयालक्ष्मी पंडित या स्वातंत्र्यपूर्व भारतातील सक्रिय राजकारणात सहभागी असलेल्या महिला नेत्या होत्या. लोक विजयालक्ष्मी पंडित यांना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण म्हणूनही ओळखतात. पण, भारताच्या स्वातंत्र्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, राजकीय कारकीर्द घडवण्यापूर्वी मुत्सद्दी म्हणून काम केले, ज्यात आणीबाणी लागू केल्याबद्दल भाची इंदिरा गांधी यांची निंदा करणे आणि राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणे यांचा समावेश होता.
जीवन परिचय अलाहाबादमध्ये १८ ऑगस्ट १९०० रोजी मोतीलाल नेहरू आणि स्वरूप राणी नेहरू यांच्या घरी विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म झाला. त्या जवाहरलाल नेहरूंपेक्षा अकरा वर्षांनी लहान होत्या. १९२१ मध्ये त्यांचा विवाह काठियावाड येथील प्रसिद्ध वकील रणजीत सीताराम पंडित यांच्याशी झाला. त्यांच्या मुलीचे नाव नयनतारा सहगल आहे. १९३२-१९३३, १९४० आणि १९४२-१९४३ या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना तीनदा अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तथापि, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारताच्या अनैच्छिक सहभागाला विरोध करण्यासाठी त्यांनी १९३९ मध्ये काँग्रेसमधील आपल्या सहकाऱ्यांसह राजीनामाही दिला होता. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन शिगेला पोहोचले असताना पंडित आणि त्यांचे पती दोघांनाही ब्रिटिशांनी अटक केली. जानेवारी १९४४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
राजकारणात विजयालक्ष्मी १९३७ मध्ये त्या संयुक्त प्रांताच्या प्रांतीय विधानसभेची निवडणूक जिंकल्या. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री बनवण्यात आले. ज्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला ठरल्या. १९३८ पर्यंत आणि पुन्हा १९४६ ते १९४७ पर्यंत हे पद सांभाळले. १९४६ मध्ये त्या संयुक्त प्रांतातून संविधान सभेवर निवडून आल्या.
संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिलायाशिवाय १९४० ते १९४२ या काळात अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्या संयुक्त राष्ट्रात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. १९४७ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राजनैतिक सेवेत प्रवेश केला आणि १९४७ मध्ये त्यांची पहिली महिला राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४७ ते १९४९ पर्यंत सोव्हिएत युनियनमध्ये, १९४९ ते १९५१ पर्यंत युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोमध्ये, १९५५ ते १९६१ पर्यंत आयर्लंडमध्ये (या काळात त्या युनायटेड किंगडममध्ये भारतीय उच्चायुक्तही होत्या) आणि १९५८ ते १९६१ पर्यंत स्पेनमध्ये त्या भारताच्या राजदूत होत्या. १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. १९९० मध्ये विजयालक्ष्मी पंडित यांचे निधन झाले.