मोहम्मद अझहरुद्दीन काँग्रेसचा 'हात' सोडणार?, अभिनेत्री विजया शांती भाजपाच्या वाटेवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:46 AM2019-09-29T11:46:52+5:302019-09-29T11:47:58+5:30
'विजया शांती सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत'
हैदराबाद : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहम्मद अझहरुद्दीन तेलंगना राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश करण्यासाठी काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजया शांती या सुद्धा भाजपामध्ये जाणार असल्याचे समजते.
सुत्रांच्या माहितीनुसार, विजया शांती काँग्रेसमधून भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र, विजया शांती यांचे पती एम.व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी सांगितले की, "विजया शांती सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी अद्याप भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतू, त्यांच्यासमोर एक प्रस्ताव आला आहे. त्यामुळे यासंबंधी त्या विचार करू शकतात. कारण, अनेक वर्षे त्या भाजपामध्ये होत्या."
दुसरीकडे, मोहम्मद अझहरुद्दीन काँग्रेस सोडून टीआरएसमध्ये जाण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मोहम्मद अझहरुद्दीन यांनी टीआरएस आणि के. टी. रामाराव यांच्या मदतीमुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद मिळवले आहे. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेण्यासाठी मोहम्मद अझहरुद्दीन प्रयत्न करत आहेत.