लखनौ - कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. त्याआधी विकासच्या तीन साथीदारांचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे. मात्र, या अटकेनंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, या अटकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय.
उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर असलेल्या विकास दुबेला मध्य प्रदेशातल्या महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आलं. मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी विकासला पकडल्याचं वृत्त एबीपी न्यूजनं दिलं आहे. विकासला पाहताच सुरक्षा रक्षक सतर्क झाले होते. त्यांनी विकासला पकडून याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. विकास दुबेला अटक होताच उत्तर प्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला रवाना झाली आहे. विकास बुधवारी फरिदाबादमध्ये दिसला होता. तिथून तो उज्जैनला कसा पोहोचला, याबद्दलची चौकशी सुरू आहे. विकासच्या अटकेसाठी पोलीस सक्रिय असताना, त्याला राज्याबाहेर जाण्यास कोणी मदत केली याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
याप्रकरणी अखिलेख यादव यांनी ट्विट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विकास दुबेला अटक करण्यात आली की, त्याने शरणागती पत्कारली याचा भांडाफोड होणं गरजेचं आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, असेही अखिलेश यांनी म्हटलंय. तसेच, विकास दुबेच्या मोबाईलचे सीडीआर सार्वजनिक करणे गरजेचं आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिभगतचा भांडाफोड होईल, असे अखिलेश यांनी म्हटलंय.
प्रभात मिश्राला पोलिसांनी फरिदाबादमधील हॉटेलमधून ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ठार केलं. विकासचा उजवा हात मानला जाणारा अमर दुबे याआधीच चकमकीत मारला गेला आहे. प्रभात मिश्राला पोलिसांनी बुधवारी फरिदाबादमधून अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यानंतर त्याला कानपूरमध्ये नेलं जात होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरजवळ महामार्गावर भौंतीजवळ त्यानं एसटीएफच्या पोलीस निरीक्षकाचं पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
विकास दुबेचा आणखी एक साथीदार रणबीरदेखील एन्काऊंटरमध्ये ठार झाला. त्याच्यावर ५० हजारांचं बक्षीस होतं. रणबीर इटावामध्ये मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर शुक्लानं रात्री उशिरा महेवाजवळील महामार्गावर स्विफ्ट डिझायर कारमध्ये लूटमार केली. त्याच्यासोबत आणखी तीन साथीदार होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काचुरा रोडवर रणबीरला घेरलं. पोलिसांनी घेरताच चकमक सुरू झाली. यामध्ये रणबीर मारला गेला. मात्र त्याच्यासोबत असलेले तीन जण पळून गेले. यानंतर इटावा पोलिसांनी शेजारील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला.