नवी दिल्ली : गँगस्टर विकास दुबेचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या एन्काऊंटरमध्ये विकास दुबे ठार झाला. या एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना काही प्रश्न विचारले आहेत. याप्रकरणी उमा भारती यांनी ट्विटद्नारे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
देवेंद्र मिश्रा यांच्यासारख्या प्रामाणिक डीएसपी आणि त्यांच्यासोबतच्या 8 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या विकास दुबे या राक्षसाचा खात्मा केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांचे अभिनंदन. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गोळ्या घालण्यात आल्या, असे उमा भारती म्हणाल्या.
याचबरोबर, उमा भारती यांनी तीन गोष्टी रहस्यमय आहेत असे सांगत प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये (१) तो उज्जैनला कसा पोहोचला? (२) तो महाकाल कॉम्प्लेक्समध्ये किती काळ राहिला? (३) त्याचा चेहरा टीव्हीवर इतका दिसून आला की कोणीही त्याला ओळखू शकले असते, मग त्याला ओळखण्यात एवढा वेळ कसा लागला?, असे उमा भारती यांनी प्रश्न विचारले आहेत.
दुसर्या ट्विटमध्ये उमा भारती यांनी म्हटले आहे की, 'मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याशी नक्कीच या विषयावर चर्चा करणार आहे. परंतु सत्य समोर आले आहे की भगवान महाकालने देवेंद्र मिश्रासारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या मारेकऱ्याला ठार केले."
विकास दुबे एन्काऊंटरनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?" असे प्रियंका यांनी म्हटले आहे. तसेच, समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकास दुबे एन्काऊंटरवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
आणखी बातम्या...
'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला
मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे
खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा
"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...