लखनौ - तीन जुलै रोजी झालेल्या चकमकीत आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिसांनी १० जुलै रोजी एन्काऊंटर केला होता. दरम्यान, या एन्काऊंटरवर विरोधी पक्ष आणि विविध संघटनांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच आता विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे. तर काही जण फेसबूकवरूनच योगी सरकार पाडण्याची धमकी देत आहेत. दरम्यान, काँग्रेससारख्या पक्षाला सुद्धा आता विकास दुबेच्या एन्काऊंटरवरून खेळल्या जात असलेल्या ब्राह्मण कार्डामध्ये राजकीय संधी दिसू लागली आहे.
उत्तर प्रदेशमधील अनेक ब्राह्मणांनी आपल्या फेसबूक पेजवरून विकास दुबेच्या एन्कांटरवरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोहिम उघडली आहे. यात एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘तुम कार पलटो हम सरकार पलटाएंगे’. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले की, श्रीप्रकाश शुक्ला याच्या एन्काऊंटरनंतर कल्याण सिंह पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. म्हटलं आठवण करून देऊ. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले आहे की, परशुरामाचा वंशज आहे पुन्हा कधीच ठाकूर समाजाच्या व्यक्तीला मत देणार नाही.दरम्यान, विकास दुबेची पत्नी आणि मुलाचा फोटोही सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच काँग्रेसचे काही नेते २२ वर्षांच्या अमर दुबेचे एन्काऊंटर आणि त्याच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेला मुद्दा बनवत आहेत. काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन यांनी प्रभात मिश्राचा एन्काऊंटर आणि अमर दुबेच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेवरून सरकारवर टीका केली आहे.
बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली असून, ब्राह्मण समाज भीतीच्या छायेखाली आहे. कुठल्याही एका चुकीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देता कामा नये. सरकारने कुठलेही असे काम करू नये ज्यामुळे ब्राम्हण समाज भयभीत होईल, असे मत मांडले आहे. मायावतींच्या या टीकेला काँग्रेस नेते नेते जितीन प्रसाद यांनीही समर्थन दिले आहेत. तसेच ब्राह्मण समाजाच्यावतीने त्यांचे आभारही मानले आहेत.