'विकास पागल हो गया है' , मोदींच्या 'घरात' राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 06:29 PM2017-09-26T18:29:34+5:302017-09-26T18:30:45+5:30
गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली.
अहमदाबाद - गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली. या वेळी एका सभेत बोलताना त्यांनी विकास को क्या हुआ है? असा प्रश्न विचारून मोदी सरकारला चिमटा काढला. राहुलच्या या प्रश्नावर लोकांनी 'गांडो थयो छे' (वेडा झाला आहे) असं उत्तर देत सरकारविरोधातील नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना, खिजदियातील सभेत राहुल गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन भाजपवर टीका केली. 'मेड इन इंडिया'चं आश्वासन दिलं होतं. पण सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होतो आहे, त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्कादेखील आहे. देशासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याची टीका राहुल गांधींनी केली. गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार होत असून नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.
जामनगरमध्ये बोलताना, राहुल गांधी म्हणाले, गुजरातमधील विद्यमान सरकार हे रिमोट कंट्रोलने चालते, दिल्लीतून हा रिमोट ऑपरेट केला जातो. राज्यातील सरकार हे दिल्ली नव्हे तर गुजरातमधूनच चालवणे गरजेचे आहे. कॉंग्रेसचं सरकार गुजरातमधूनच चालेल, अशी ग्वाही देत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचं सरकार आल्यास विकासकामं पुन्हा सुरू केली जातील, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि सगळ्यांना हक्काचं घरही देऊ, अशी आश्वासनं राहुल यांनी दिली. पटेल समाजावर मोदी सरकारने गोळीबार केला, पण काँग्रेसला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे असे सांगत त्यांनी पाटीदार समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.