अहमदाबाद - नोटाबंदी, जीएसटी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फसलेले निर्णय असून यामुळे शेतकरी, छोटया दुकानदारांचे नुकसान झाले आहे. देशभरात शेतकरी आत्महत्या करत असून, शेतक-यांच्या जमिनी हिसकावून घेणे हे मोदींसाठी फक्त दोन मिनिटांचे काम आहे अशा शब्दात राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली.
तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर असलेले राहुल गांधी खेडामध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. जीएसटी लागू करण्याचा छोटया उद्योगांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. मोदी सरकार फक्त उद्योगपतींना मदत करत आहे. नरेंद्र मोदी फक्त मन की बात करतात अशी टीका राहुल यांनी केली.
गुजरातमध्ये विकासला काय झालंय? तो कसा वेडा झाला ? सतत खोटं बोलणं ऐकून विकास वेडा झाला असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच गुजरात मॉडेल पूर्णपणे फेल झालं आहे. काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेवर आली तर, आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासोबत हिंदुत्व कार्डही खेळत आहेत. राहुल गांधी यांनी याधीच्या तीन दिवसांच्या गुजरात दौ-यात पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले.
राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे चामुंडा देवी मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी मंदिराच्या एक हजार पाय-या चढल्या. पटेल समाजासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या कागवाड गावातील खोडलधाम येथेही ते गेले होते. येथे पटेल समाजातील लोकांनी एक भव्य मंदिर बांधलेलं आहे. राजकोटला परतल्यानंतर राहुल गांधी जलाराम बापा मंदिरात गेले होते.
चीनने डोकलाममध्ये रस्ता बनवायला सुरुवात केलीय त्यावरुनही राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. छाती ठोकून झाली असेल, तर चीनच्या रस्ता बांधणीच्या कामावर स्पष्टीकरण देणार का ? असा सवाल त्यांनी मोदींना विचारला होता.