बंगळुरू: चंद्रयान-३ मोहिमेतील १४ दिवसांची यशस्वी कामगिरी पूर्ण करत विक्रम लँडर आज सकाळी ८ वाजता निद्रावस्थेत गेला. तत्पूर्वी प्रग्यान रोव्हरही शनिवारी झोपी गेला होता. चंद्रावर आता रात्र झाली असून तिथे १४ दिवसांनी म्हणजे २२ सप्टेंबरला दिवस उजाडेल. त्या दिवशी विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर पुन्हा सक्रिय होण्याची आशा इस्रोने व्यक्त केली.
दरम्यान, विक्रम लँडरने शनिवारी स्वतःला ४० सेंटिमीटरपर्यंत वर उचलत ३० ते ४० सेंटिमीटर अंतरावर पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग करण्याची कामगिरी केली. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग केले होते. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. (वृत्तसंस्था)
चंद्रावर आता रात्र झाल्याने सोमवारी सकाळी आठ वाजता विक्रम लँडर निद्रावस्थेत गेला. तसेच चास्ते, रंभा-एलपी, आयएलएसए या पेलोडचे काम बंद ठेवण्यात आले, केवळ विक्रम लँडरचे रिसिव्हर सुरू ठेवण्यात आले आहेत. - इस्रो
विक्रम लँडरने पुन्हा घेतलेली झेप ही चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी तसेच भावी मानवी मोहिमांसाठी उपयुक्त ठरणारी आहे, असेही इस्रोने म्हटले.