बुधवार २३ ऑगस्ट २०२३ हा दिवस भारतासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडर उतरण्यासाठी चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. रशियाचं लूना-२५ हे यान कोसळल्यानंतर आता जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर भारताच्या चंद्रयान-३ चं काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना इस्रोने अव्वल ट्रॅक रेकॉर्ड पाहता कुठल्याही प्रकारचं अघटित घडण्याची शक्यता कमी आहे. मात्र जर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर लँडिंगची तारीख किंवा लँडिंगची जागा बदलली जाऊ शकते.
अहमदाबादमधील स्पेल अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक डॉ. निलेश देसाई यांनी याबाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, लँडिंगची प्रक्रिया ही २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पूर्ण होईल. तसेच सॉफ्ट लँडिंग हे यशस्वीरीत्या पूर्ण होईल. त्यांनी सांगितले की, जर कुठल्याही कारणामुळे लँडिंग होऊ शकलं नाही तर या प्रक्रियेमध्ये बदल केला जाईल.
डॉ. देसाई यांनी सांगितले की, यावेळी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागापासून ३० किमी उंचीवर भ्रमण करत आहे. जर २३ ऑगस्ट रोजी काही अडथळे आले तर २७ ऑगस्टला लँडिंगचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे उंची ३० किमी ऐवजी १८ किमी असेल. तसेच जागेमध्ये मुंबई ते अहमदाबाद अंतराएवढा बदल असेल. म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी ज्या जागेची निवड केली गेली आहे. त्यापेक्षा ४०० किमी दूर नवी जागा असेल. त्यांनी सांगितले की, सध्या आमची मोहीम ही यशस्वीरीत्या पुढे जात आहे.