श्रीनगर- रोहिंग्यांनी भारतात प्रवेश केल्यापासून त्यांना देशाबाहेर परत पाठवण्यावर चर्चा सुरु आहे. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत पाठवू नये अशी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. देशात रोहिंग्यांची सर्वात जास्त असणा-या जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र आता हा राजकारणाचा मुद्दा झाला आहे. पीडीपीच्या नेत्या व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रोहिंग्यांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेवरुन पक्षाचे ज्येष्ठ नेते विक्रमादित्य सिंग यांनी पक्षसदस्यत्त्व व विधानपरिषदेचा राजीनामा दिला आहे.
विक्रमादित्य सिंग हे जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे राजे हरी सिंग यांचे नातू आणि राज्यसभेत दीर्घकाळ सेवा बजावणारे कर्णसिंह यांचे पुत्र आहेत. पीडीपीकडून जम्मू प्रदेशावर अन्याय होत असताना मी या पक्षात राहणे नैतिक व तात्विकदृष्ट्या योग्य ठरणार नाही असे विधान करत विक्रमादित्य यांनी राजीनामा दिला आहे. मेहबूबा मुफ्ती या केवळ काश्मीरच्या मुख्यमंत्री नसून संपुर्ण प्रदेशाच्या ( जम्मू, काश्मीर, लडाख) मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं विक्रमादित्य यांनी यावेळेस स्पष्ट केले. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आपण विधानपरिषदेच्या अध्यक्षांकडे सभागृह सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
राजा हरिसिंग यांचा २३ सप्टेंबर हा जन्मदिन साजरा करण्यासाठी सुट्टी जाहीर करणे, डोग्रा इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात करणे, रोहिंग्यांमुळे झालेले प्रश्न हे सर्व जम्मूच्या लोकांसांठी भावनिक मुद्दे आहेत. मात्र सध्या जम्मू आणि काश्मीरया दोन प्रांतांमध्ये मोठी प्रादेशिक फूट पडली आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात सिंग यांनी, राज्याचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांचे जम्मू, काश्मीर, लडाख या तिन्ही प्रांतांतील अविश्वासाची वाढती दरी कमू करण्याच्या प्रयत्नांचे स्वप्न अर्धवट राहिल्याचेही विक्रमादित्य सिंग यांनी लिहिले आहे. तसेच मुफ्ती महंमद सईद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्याला विविध जबाबदा-या दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.