हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी भाजपाच्या उमेदवार कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विक्रमादित्य सिंह यांनी शनिवारी (11 मे) सांगितले की, अभिनेत्री स्वतःबद्दल इतकं बोलते की, आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही उरलेलं नाही.
लाहौल आणि स्पीतीच्या काझा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना विक्रमादित्य सिंह म्हणाले की, कंगना राणौतने लोकांना सांगावं की, ती स्पीतीमध्ये का आली नाही आणि रेकॉन्ग पीओमधून परत आली? कंगना राणौतने दलाई लामांविरोधात केलेल्या विधानांमुळे तिचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले जाईल या भीतीने कंगना स्पितीमध्ये आली नाही, असा दावा त्यांनी केला.
विक्रमादित्य सिंह यांनी कंगनाला लगावला टोला
"जर त्यांचं मन शुद्ध असेल तर त्यांनी स्पितीला भेट द्यायला हवी होती. अभिनेत्री कधी कधी म्हणते की, भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि सुभाष चंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. आता तिने स्वतःची प्रशंसा करायला सुरुवात केली आहे आणि म्हणू लागली आहे की, अमिताभ बच्चन यांच्यानंतर ती एकमेव कलाकार आहे ज्यांना देशभरातील लोक ओळखतात."
"ती मणिपूरला गेली नाही ही चांगली गोष्ट आहे. ती चुकून मणिपूरला गेली असती तरी ती परत येऊ शकली नसती, कारण भाजपा सरकारने महिलांवरील अत्याचारातून अशी परिस्थिती या ईशान्येकडील राज्यात निर्माण केली आहे. कोरोना साथीच्या काळात ती मनालीमध्ये होती तेव्हा तिने विरोध करणाऱ्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती" असं विक्रमादित्य सिंह यांनी म्हटलं आहे.