तेलंगणातील दम्मापेटा गावातील भोगी सम्मक्का हिने आपल्या मेहनतीने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. भोगी सम्मक्का हिने तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TGPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आणि लेक्चरर पद मिळवलं, तेलंगणा पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण केली. TGPSC गट IV उत्तीर्ण केली आणि ज्युनिअर असिस्टेंट म्हणून निवड झाली. सर्वच जण तिचं कौतुक करत आहेत.
एकाच वेळी तब्बल तीन सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत. भोगी सम्मकाने घरीच तयारी केली. कोणत्याही कोचिंगची मदत न घेता, तिने सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी खूप मेहनत केली. सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी कोचिंगची गरज नाही, तर आत्मविश्वास आणि योग्य दिशेने कठोर परिश्रम पुरेसे आहेत, असं तिचं स्पष्ट मत आहे.
भोगीची आई भोगी रमना या अंगणवाडी शिक्षिका आहेत आणि वडील सत्यम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमीने तिला समाजाप्रती जबाबदारीची जाणीव करून दिली आणि पुढे जाण्याची हिंमत दिली. तिने प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केलं आणि उस्मानिया विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी प्राप्त केली.
तीन सरकारी नोकऱ्या असूनही भोगी सम्मक्का हिचा प्रवास इथेच संपत नाही. संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचं तिचं मोठं स्वप्न आहे. हा प्रवास अवघड नक्कीच आहे, पण अशक्य नाही असं देखील तिने आवर्जून म्हटलं आहे.
भोगी सम्मकाची गोष्ट ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती बिकट असूनही मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस केलं. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतंही आव्हान तुम्हाला रोखू शकत नाही, हे तिच्या कष्टाने आणि संघर्षाने सिद्ध केलं. कोचिंगशिवाय गावात राहून एवढं मोठं यश मिळवणं सोपं काम नाही, पण अशक्यही नाही हेच दाखवून दिलं आहे.