ऑनलाइनल लोकमत
गुरुग्राम, दि. 14 - उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्तता मिळवणा-या गावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव देण्यात येणार आहे. सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिरेंद्र पाठक यांनी ही घोषणा केली आहे. मेवात येथील जे गाव उघड्यावर शौचालयाला जाण्यापासून मुक्तता मिळवेल त्या गावाचं डोनाल्ड ट्रम्प असं नामकरणच करण्यात येणार आहे. यामुळे जगाचं स्वच्छ भारत मोहिमेकडे लक्ष वेधलं जाईल असा विश्वास बिरेंद्र पाठक यांनी व्यक्त केला आहे. तसंच भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्यासही मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
वॉशिंग्टन डी सी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बिरेंद्र पाठक यांनी ही घोषणा केली. बिरेंद्र पाठक यांची संस्था सध्या मेवात येथील काही गावांना उघड्यावर शौचलायाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. बिरेंद्र पाठक एक सामाजिक कार्यकर्ता असून कमी पैशात स्वच्छता आणि शौचालय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
बिरेंद्र पाठक भारतात आल्यानंतर काही गावांचा दौरा करणार आहेत. मेवातलाही भेट देणार असून येथील ग्रामस्थांशी ते चर्चा करणार आहेत. गावक-यांना या घोषणेची माहिती मिळाल्यापासून त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला असून यामुळे आपलं भविष्य उज्वल होईल अशी आशा त्यांना वाटत आहे.
"सरकार स्वच्छतेच्या दिशेने पाऊल उचलत आहे. उघड्यावर शौचालयाला जाण्याची पद्धत पुर्णपणे बंद झाली पाहिजे आमची संस्था यासाठी सतत प्रयत्न करत आहे. या मोहिमेत आम्हाला साथ द्यावी यासाठी आम्ही ग्लोबल कम्युनिटीला आवाहन करतो", असं बिरेंद्र पाठक बोलले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असताना ही घोषणा करण्यात आली आहे.