राजगड- अनेक गावांच्या संदर्भात विविध प्रकारच्या दंतकथा जोडलेल्या असतात. मात्र मध्यप्रदेशातील एकागावाची कहाणी मात्र चकीत करणारी आहे. गेल्या 400 वर्षात या गावात एकाही बाळाचा जन्म होऊ देण्यात आलेला नाही. या गावातील गरोदर महिलेला गावाच्या सीमेबाहेर काढण्यात येते. या गावातील लोक आपल्या गावाला असा शापच आहे असे म्हणतात त्यामुळे गेल्या 400 वर्षात गावातील एकाही महिलेने गावाच्या सीमेमध्ये मुलाला जन्म दिलेला नाही. हा समज आजही येथिल गावकऱ्यांमध्ये रुढ आहे.या गावाचे नाव संका श्यामजी असे असून ते राजगड जिल्ह्यामध्ये आहे. या गावात एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला तर ते विचित्र आकारात जन्माला येते किंवा माता किंवा बाळापैकी एकाचा मृत्यू होतो असा समज या गावामध्ये आहे.गरोदर महिलेला गावाच्या बाहेर जाऊन बाळंतपण करावे लागते. गावाचे सरपंच नरेंद्र गुर्जर म्हणतात, गावातील महिलांची 90 टक्के बाळंतपणे रुग्णालयांत होतात आणि इमर्जन्सी प्रसंगी बाळंतपण गावाच्या बाहेर होतात. या गावात एका मंदिराचे बांधकाम सुरु असताना त्यात एका महिलेमुळे अडथळा आला त्यामुळे या गावाला शाप देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गावातील ज्येष्ठ लोक सांगतात, 16 व्या शतकामध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु असताना एक महिला गहू दळत होती. त्यामुळे मंदिराचे बांधकाम करण्यात व्यत्यय येत होता त्यामुळे देवतांनी या गावात कोणतीही महिला बाळाला जन्म देऊ शकणार नाही असा शाप दिला. त्यानंतर गावात बाळंतपण थांबवले गेले.काही अपवादात्मक प्रसंगी गावात बाळंतपण झाल्यास बाळ एखाद्या व्यंगासह जन्माला आल्याचे किंवा माता किंवा बाळापैकी एकाचा मृत्यू झाल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळेच गावकऱ्यांनी गावाबाहेर एक खोली बांधली असून तेथे सर्व बाळंतपणे केली जातात.
मध्यप्रदेशातील या गावात गेल्या 400 वर्षांमध्ये एकाही बाळाचा जन्म झालेला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 3:54 PM