गांधीनगर : गुजरातच्या दाहोदमध्ये बुधवारी घाणेरडा प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी प्रियकर आणि प्रेयसीला जबर मारहाण केली. यावर मन भरले नाही म्हणून विवस्त्र केलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या खांद्यावर बसवून एक किमी फिरविल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर सक्रीय झालेल्या पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींनी अटक केली आहे. तर दोघांच्या शोधात आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे प्रभु, मीनेष, जयंती, राजू आणि निलेश असे आहे.
दाहोद जिल्ह्यातील फतेपुरा तहसीलमध्ये राहणारी विवाहित महिला आणि झालोदमध्ये राहणारा अविवाहित तरुण 17 दिवसांपूर्वी पळून गेले होते. ते या काळात इडरच्या मेसण गावात मोलमजुरी करून दिवस घालवत होते. यावेळी काही गावकऱ्यांनी दोघांना पकडले आणि महिलेच्या सासरी घेऊन आले.
यानंतर गावकऱ्यांनी तरुणाला निर्वस्त्र करत दोऱ्यांनी बांधले आणि दांड्याने मारहाण केली. यानंतर त्यांनी महिलेलाही मारहाण केली मात्र, दांडा तुटला. एवढ्यावरच न थांबता तरुणाला या महिलेच्या खांद्यावर बसवून एक किमीपर्यंत धींड काढली. यावेळी सोबत चालणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर दगड़ही फेकले.