महासमुंद - शेतकरी शेतात राबून अन्नधान्य पिकवत असतात. मात्र अनेक ठिकाणी जंगलातील प्राणी त्यांच्या पिकांचं नुकसान करतात. हत्तींनी धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर येत असतात. हत्ती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करतात. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीची नासधूस करतो. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच देवाकडे प्रार्थना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील कुकराडीह गावामध्ये शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हत्तींच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेताजवळ ही मूर्ती उभारली आहे. कुकराडीह गावात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान करत आहे.
शेतकऱ्यांनी अनेकदा याबाबत सरकार आणि प्रशासनाला माहिती दिली. तसेच या समस्येवर काहीतरी मार्ग काढावा असे सांगितले. मात्र प्रशासनाने अद्याप काहीच उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी आता हत्तीची मूर्ती उभारून देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे. 'आम्ही विधिवत पूजा करून शेतामध्ये हत्तीची मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून आमच्या शेताचे रक्षण करेल. हत्तीची ही मूर्ती आमच्या संपूर्ण गावाचं रक्षण करेल असा विश्वास आहे' अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
हत्तींमुळे शेतीचे खूप नुकसान होत आहे. हत्तींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वन विभागाने म्हटलं आहे. मात्र कुकराडीह गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच पूजा करून देवाकडे प्रार्थना केली आहे. गणपती बाप्पा हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी त्यांना आशा आहे. वनविभागचे अधिकारी मयांक पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही शेतकऱ्यांचा विश्वासाचा आदर करतो. हत्तींमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.'