ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. १७ - कर्नाटकमध्ये गावक-यांनी दगडाने ठेचून मगरीला मारल्याची निर्दयी घटना घडली आहे. नदीतून बाहेर आलेली ही मगर एका शेतात घुसली होती. गावक-यांनी दगड आणि विटांनी हल्ला करुन तिचं डोक ठेचलं. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमे-यात शुटदेखील करण्यात आला आहे.
यादगीर जिल्ह्यातील शिवनूर गावात ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना कधी घडली ? याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. दगडाने या मगरीचं डोक ठेचल्यानंतर दोन गावकरी तिला शेपटीच्या सहाय्याने ओढत होते. मात्र ती जिवंत असल्याचं पाहिल्यावर गावक-याने पुन्हा तिच्यावर दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केली.
वनअधिकारी चक्रपाणी यांनी स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी आल्यानंतर शिवनूर गावात जाऊन चौकशी केली असता गावक-यांनी 20 दिवसांपुर्वी मृत मगर पाहिल्याचं सांगितलं. मात्र ही मगर गावात नेमकी कधी आली होती याची माहिती मिळाली नाही. मगरीची हत्या करणं वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्याअंतर्गत दंड आणि कारागृहाची शिक्षा होऊ शकते. वनविभाग सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.