एकीकडे कोरोनामुळे जगभरातील अनेकजण घरात बंदिस्त असल्याचे पाहाला मिळाले. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या डॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचे अनेकांनी सदुपयोग केल्याचे निदर्शनास आले.लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत अर्नाकुलम जिल्ह्यातील वडक्ककेरा पंचायतीने ठरवले की, गावात कुणीच रिकामे बसणार नाही. त्यानुसार, आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले. नंतर मोकळ्या जागेत मशागत करून पेरणी केली आणि हिरव्यागार भाज्यांचे पीक घतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला नवीन गती मिळवून देईल असे म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा छोटासा प्रयत्न असला तरीही एक उत्तम उदाहरण आज या गावकऱ्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.
घराच्या दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडे अशी संस्कृती ग्रामीण भागात पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच अंगण संस्कृती आजही गावक-यांनी जपली आहे. म्हणूनच गावातील मोकळ्या जागा, घरांजवळ तसेच छतांवरही भाज्या लावायचे गावक-यांनी ठरवले. विशेष म्हणजे यात खते वापरायची नाहीत, असेही ठरले. या मोहिमेला 'द व्हिजिटेबल फार्मिंग चॅलेंज' असे नाव देण्यात आले. ७० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये हे लोक भाज्यांबाबत स्वावलंबी झाले आहेत. सामूहिक प्रयत्नांतून भाज्यांचे हे उत्पादन इतके झाले की केरळ सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मदत सुरू केली. या गावात लोक अगोदर छोटे गट करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले. नंतर त्या जागेची मशागत केली. ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या प्रकारच्या बियांची २० हजार पाकिटे मोफत दिली.
आज येथे प्रत्येक घरात भेंडी, वांगी, भोपळे, टोमॅटो इत्यादी भाज्या डोलू लागल्या आहेत. याच माध्यमातून आपल्या घराबाहेर निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रमही गावात राबवला जात आहे. अशा प्रकारे भाज्यांची लागवड केल्यामुळे त्यांच्याही कुटुंबाचा घरखर्चही निघाला आणि इतरांनाही भाज्या उपलब्ध झाल्यामुळे अनेकांच्या गरजाही पूर्ण झाल्या.