नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल बैजल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
सध्या विनय कुमार सक्सेना हे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत. 23 मार्च 1958 रोजी जन्मलेले विनय कुमार सक्सेना हे कानपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यांनी कॉर्पोरेट तसेच एनजीओ क्षेत्रात काम केले आहे. याशिवाय, विनय कुमार सक्सेना 1984 मध्ये राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सामील झाले होते आणि 11 वर्षे काम केले होते.
दरम्यान, अनिल बैजल यांनी 18 मे रोजी अचानक दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. अनिल बैजल यांनी राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण दिले होते. अनिल बैजल यांना दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून डिसेंबर 2016 मध्ये नियुक्त करण्यात आले होते. अनिल बैजल आणि केजरीवाल सरकारमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याच्या बातम्या येत होत्या.
गेल्या वर्षी जुलैमध्येही, शेतकरी आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये वकिली करण्यासाठी दिल्ली मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या वकिलांची यादी अनिल बैजल यांनी नाकारली तेव्हा केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात मतभेद झाले होते. तसेच, अनिल बैजल आणि केजरीवाल सरकारमध्ये डोअर स्टेप डिलिव्हरीबाबत वाद झाला होता.
अनिल बैजल यांची कारकीर्द!अनिल बैजल हे 1969 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना त्यांची केंद्रीय गृह सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांची शहरी विकास मंत्रालयामध्ये बदली करण्यात आली. अनिल बैजल यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इंडियन एअरलाईन्सचे चेअरमन, प्रसार भारतीचे सीईओ, गोव्यामध्ये डेव्हलपमेन्ट कमिशनर तसेच नेपाळला भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या मदत कार्यामध्ये काऊंसेलर इनचार्ज म्हणून काम पाहिले.