मतदारसंघात पाय न ठेवता काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 01:27 PM2023-05-14T13:27:49+5:302023-05-14T13:28:11+5:30
त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा पराभव केला.
हुबळी : सर्वाेच्च न्यायालयाने मतदारसंघात जाण्यास बंदी घातली असतानाही काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री विनय कुलकर्णी धारवाड मतदारसंघातून १८ हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा पराभव केला.
विद्यमान आमदाराला सलग दुसऱ्यांदा निवडून न देण्याची परपंरा या मतदारसंघाने यावेळीही कायम राखली आहे. भाजप कार्यकर्ते योगेश गौडा यांचा २०१६ मध्ये खून झाला होता. याप्रकरणी विनय कुलकर्णी एक संशयित आरोपी आहेत. २०२० मध्ये त्यांना याप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना मतदारसंघात जाण्यास मनाई केली होती. तरीही काँग्रेसने यावेळी त्यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे आमदार अमृत देसाई यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये असंतोष होता.
विनय कुलकर्णी यांच्या पत्नी शिवलिला यांनीच या निवडणुकीत त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. मतदारसंघामधील असंतोषाचे रुपांतर काँग्रेससाठी मतदानांमध्ये करण्यात शिवलिला आणि त्यांचे कार्यकर्ते यशस्वी ठरले. विनय हे ८९,३३३ मते मिळवून १८,०३७ मताधिक्याने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची १,५२१ मते नोटाला आहेत.