नवी दिल्ली-
शिवसेनेच्या १२ खासदारांनीही आता बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर बंडखोर खासदार वेगवेगळे गौप्यस्फोट करू लागले आहेत. उद्धव ठाकरे युतीसाठी आग्रही होते असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केल्यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर पैसे उकळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
"युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण..."; राहुल शेवाळेंनी युतीचा अणुबॉम्बच फोडला!
"विनायक राऊत यांच्या संदर्भात आमच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळेच आम्हाला लोकसभेत नवा गटनेता हवा होता. विनायक राऊतांनी कशापद्धतीनं संघटनेत पदं देत असताना आणि उमेदवारी देताना पैसे उकळले याची पुराव्यासहीत माझ्याकडे माहिती आहे", असा खळबळजनक दावा हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले हेमंत पाटील?"विनायक राऊत यांनी कशापद्धतीनं पक्षसंघटनेत पदं देत असताना आणि उमेदवारी वाटताना पैसे उकळलेले आहेत. पुराव्यासहीत माहिती माझ्याकडे आहेत. आम्ही खासदार तर आहोतच पण मतदारांशी देखील आम्ही बांधील आहोत. मागच्या तीन वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं काम माझ्या मतदार संघात झालेलं नाही. माझा जिल्हा हळदीचा जिल्हा आहे. त्यासाठी मी बाळासाहेबांच्या नावानं मोठं रिसर्च सेंटर व्हावं यासाठी मी प्रयत्न करत होता. एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी मला त्यासाठी मदत केली. माहुरगड, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ, नरसिंग नामदेव हे मोठी देवस्थान आहेत. ही पर्यटनाच्या सर्किट डेव्हलप करण्यासाठी शिदेंनी सूचना दिल्या आहेत", असं हेमंत पाटील म्हणाले.
...तेव्हा युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर चर्चा, बंडखोर खासदाराने स्पष्टच सांगितलं
"विनायक राऊतांबाबतची व्यथा ही माझी एकट्याची व्यथा नाहीय. मी संघटनेमध्ये गेल्या ३५ वर्षांपासून काम करतोय. शिवसेनेचा १२ वर्ष जिल्हाप्रमुख राहिलोय. एका जिल्हाप्रमुखाला काम करताना काय त्रास आहे यावर मी लवकरच सविस्तर बोलेन. स्वत:च्या वाढदिवसाच्या जेवणावळीसाठी विनायक राऊतांनी संतोष बांगर यांच्याकडून पैसे घेतले. संतोष बांगरकडून सोन्याची चेन घेतली. अशा अनेक पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी पैसे घेतले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांकडून त्यांनी पैसे उकळले आहेत", असा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.