रायसेन - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सगळीकडे कार्यक्रम होत असताना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भूपेश बघेल यांनी सावरकरांची संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली असल्याचं विधान केलं आहे.
यावेळी बोलताना भूपेश बघेल म्हणाले की, वीर सावरकर यांनी दोन राष्ट्राची संकल्पना आणण्याचा विचार मांडला होता. त्यानंतर मोहम्मद जिना यांनी ती संकल्पना स्वीकारली. यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. तसेच सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. त्यानंतर जेलमधून सुटल्यावर त्यांनी स्वतंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही असंही भूपेश बघेल यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्याआधीही सावरकरांवर काँग्रेस आणि भाजपामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटला होता.
राजस्थान सरकारने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशींवरुन पाठ्यक्रमात बदल करण्यात आल्याचा दावा राजस्थानमधील शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी केला होता. दोतासरा यांनी सांगितले होते की, मागील सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानाला महत्त्व दिलं नाही. मात्र पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांच्या धड्यात बदल करणे म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपाने काँग्रेस सरकरावर केली होती.मोहम्मद जिना यांच्या मागणीवरुनच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. मुस्लिम राष्ट्र म्हणून जिना यांनी पाकिस्तानला ओळख दिली. त्यामुळे भूपेश बघेल यांनी केलेले विधानावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.