नवी दिल्ली - मृत्यू कधी कोणाला जवळ करेल काही सांगता येत नाही, मात्र इच्छाशक्ती असली की माणूस कोणतंही ध्येय सहज गाठू शकतो. विनायक श्रीधर नावाचा विद्यार्थ्याचं स्वप्न अंतराळातील शोध घेण्याचं होतं. स्टीफन हॉकिंग हे त्याचा आवडता वैज्ञानिक होते. हे स्वप्न उराशी बाळगून विनायक सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेमध्ये बसला. तीन पेपर दिल्यानंतर परीक्षेच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला. सीबीएसईचा निकाल लागल्यानंतर विनायकने दिलेल्या तीन पेपरमध्ये त्याला इंग्रजीमध्ये 100, विज्ञान 96 आणि संस्कृत या विषयामध्ये 97 गुण मिळाले यावरून विनायक बौद्धिक क्षमता किती होती याचा अंदाज लागलाच असेल.
नोएडा येथील एमिटी स्कूलमध्ये विनायक श्रीधर शिक्षण घेत होता. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याला ड्युशेन मस्क्युलर डायस्ट्राफी(डीएमडी) सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावं लागलं. या आजारामुळे शरीरातील मांसपेशी कमकुवत झाल्याने दिवसेंदिवस हा आजार भयंकर झाला. या सगळ्या संकटाला सामोर जात विनायकने जिद्दीने व्हिलचेअरवर बसून सामान्य मुलांप्रमाणे दहावीच्या परीक्षेला बसला. विनायकची आई ममता यांनी सांगितले की, त्याच्या मांसपेशी कमकुवत झाल्याने विनायकची हालचाल बंद झाली. त्यामुळे त्याला परीक्षेला बसून पेपर लिहिणंही कठीण होतं. तरीही सहाय्यकाच्या जोरावर विनायक परीक्षेला बसला. दोन पेपर झाल्यानंतर तिसरा संस्कृत पेपर विनायकने स्वत: लिहिण्याचे ठरवले. शारीरिक अपंगत्त्व आल्यानंतरही त्याला मात देण्याचा निश्चय विनायकने केला. विनायकच्या शरीराने त्याची साथ सोडली असली तरी त्याची बौद्धिक क्षमता प्रबळ होती. त्याची महत्त्वकांक्षा अफाट होती. वैज्ञानिक बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. स्टीफन हॉकिंगप्रमाणे व्हिलचेअरवर बसूनही आधुनिक विज्ञानाला नवी दिशा देण्याचा मानस त्याने केला होता.
मात्र परीक्षेच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला. तीन पेपर दिल्यानंतर इतर पेपरमध्ये त्याची अनुपस्थिती दाखविण्यात आली. दुर्दैवाने आज विनायक या जगात नाही. मात्र विनायक असतानाही त्याच्या कुटुंबीयांनी रामेश्वरमला जाण्याचं नियोजन केलं होतं. परीक्षा झाल्यानंतर विनायकची इच्छा रामेश्वरमला जाण्याची होती. आज विनायक नसला तरी त्याची इच्छा आम्ही पूर्ण करणार या हेतूने त्याच्या कुटुंबीयांनी रामेश्वरमला जाण्याचा निर्णय घेतला. विनायकचे वडिल जीएमआरमध्ये उपाध्यक्ष आहेत तर आई ममता या गृहिणी आहे. विनायकची संपूर्ण जबाबदारी आई समर्थपणे सांभाळत होती. सीबीएसईचा निकाल जाहीर झाला, मात्र विनायक नसल्याची खंत कायम आईला सतावत राहणार आहे.