Sakshi Malik on Vinesh Phogat-Bajrang Punia : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोघांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपालही तिथे उपस्थित होते. दोघांनाही काँग्रेसची उमेदवारी मिळणे जवळ-जवळ निश्चित मानले जात आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशापूर्वीच विनेश आणि बजरंगने शुक्रवारी रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे.
'मी शेवटपर्यंत संघर्ष करेन'दरम्यान, विनेश आणि बजरंगच्या पक्षप्रवेशावर कुस्तीपटू साक्षी मलिक नाराज असल्याची चर्चा आहे. मीडियाशी संवाद साधताना साक्षी म्हणाली की, "काँग्रेसमध्ये सामील होणे, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. फक्त आमच्या आंदोलनाबाबत चुकीचा अर्थ निघू नये. महिलांसाठी माझी चळवळ आजही सुरू आहे. मी नेहमीच कुस्तीचा विचार केला आणि कुस्तीच्या हितासाठी काम केले. मलाही मोठ्या ऑफर्स आल्या, पण ज्या गोष्टीसाठी काम करतेय, ते शेवटपर्यंत काम करायचे आहे. जोपर्यंत कुस्ती महासंघ व्यवस्थापन नीट होत नाही, महिलांचे शोषण थांबत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील," अशी प्रतिक्रिया साक्षीने दिली.
विनेश फोगट-बजरंग पुनिया निवडणूक लढवणारविनेश फोगटला काँग्रेसकडून तिच्या गृह जिल्ह्यातील चरखी-दादरीतून तिकीट देऊ शकते. तसेच, विनेशचे सासर असलेल्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, बजरंग पुनियाला काँग्रेस बदली मतदारसंघातून तिकीट देऊ शकते. ही जागा आधीच काँग्रेसच्या ताब्यात आहे. बजरंग पुनियाला उमेदवारी दिल्यास विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.