Vinesh Phogat : "आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते की, इच्छा नसतानाही..."; विनेश फोगाटचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 02:33 PM2024-09-10T14:33:45+5:302024-09-10T14:46:14+5:30
Vinesh Phogat And Congress : कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश करून हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश करून हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर आता विनेशने एक मोठं विधान केलं आहे. "आयुष्यात अनेकवेळा अशी परिस्थिती उद्भवते की, इच्छा नसतानाही तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने मी हा निर्णय घेतला आहे" असं विनेश फोगाटने म्हटलं आहे.
"मोठ्यांशिवाय, देवाशिवाय काहीही करू शकत नव्हते, तेव्हाही त्यांनी मला जिंकून दिलं होतं, आताही तेच लोक मला विजयी करतील. त्यांच्याशिवाय मी काही नाही, जे कष्ट करतील त्यांनाच हे लोक आशीर्वाद देतील. महिला आशेने माझ्याकडे पाहत आहेत, मी त्यांना खात्री देते की मी तुमच्यासाठी सर्वप्रथम उभी राहीन, कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते की, इच्छा नसतानाही तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन मी निर्णय घेतला आहे."
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करताना, विनेश फोगाटने रविवारी सांगितलं की, लोकांच्या आशीर्वादाने प्रत्येक लढाई जिंकण्याची आशा आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली की, "ब्रिजभूषण देश नाही. माझा देश माझ्या पाठीशी उभा आहे. माझे प्रियजन माझ्यासोबत उभे आहेत आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत."
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश फोगाटला उमेदवारी दिली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख आणि भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनात पुढे असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.