Vinesh Phogat : "आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेलं, तेव्हा..."; विनेश फोगाटने सांगितलं काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:06 PM2024-09-06T16:06:22+5:302024-09-06T16:12:25+5:30

Vinesh Phogat And Congress : कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर तिने आता पहिली प्रतिक्रिया दिली.

Vinesh Phogat joins Congress says feeling proud standing with every women | Vinesh Phogat : "आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेलं, तेव्हा..."; विनेश फोगाटने सांगितलं काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण

Vinesh Phogat : "आम्हाला रस्त्यावरुन फरफटत नेलं, तेव्हा..."; विनेश फोगाटने सांगितलं काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण

कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर तिने आता पहिली प्रतिक्रिया दिली. "मला आशा आहे की, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन. काँग्रेसचे खूप खूप आभार. वाईट काळात आपलं कोण हे कळतं. आज मला खूप अभिमान वाटतो की, मी अशा पक्षात आहे जो महिलांसाठी रस्त्यांपासून संसदेपर्यंत लढायला तयार आहे."

"जेव्हा आम्हाला रस्त्यावरून फरफटत नेलं जात होतं, तेव्हा भाजपा सोडून सर्व पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आजपासून मी नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. जी लढाई सुरू होती ती सुरूच आहे, ती लढाई आपण जिंकू. आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही" असं विनेशने म्हटलं आहे. 

"मी प्रत्येक महिलेच्या पाठीशी उभी आहे जी स्वत:ला असहाय्य समजते. मला हवं असतं तर मी जंतरमंतरवर कुस्ती सोडू शकले असते. भाजपाच्या आयटी सेलने आमची कारकीर्द संपल्याचं खोटं पसरवलं. मला खेळायचं नाही असं त्यांनी म्हटलं. पण मी नॅशनल खेळले, ऑलिम्पिक खेळले. देवाची वेगळीच योजना होती." 

"डोपिंगच्या आरोपाखाली बजरंगला चार वर्षांसाठी बॅन करण्यात आलं आहे कारण तो आमच्यासोबत उभा होता. आमचा लढा न्यायालयात सुरूच राहणार आहे. मी मनापासून खेळले, मी मनापासून तुझ्यासोबत उभी राहीन" असंही विनेश फोगाटने म्हटलं आहे. 

विनेशसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला बजरंग पुनिया म्हणाला की, "भाजपा आयटी सेलचं म्हणणं आहे की, आमचं एकमेव उद्दिष्ट राजकारण करणं आहे. आम्ही भाजपा, त्यांच्या महिला खासदारांना निमंत्रित केलं होतं, पण त्या मुलींच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत. पण काँग्रेस आमच्या पाठीशी उभी होती." 

"मुलींवर होणाऱ्या अन्यायासोबत भाजपा होता, इतर पक्ष आमच्यासोबत होते. जेव्हा विनेश अंतिम फेरीत पोहोचली तेव्हा संपूर्ण देश आनंदी होता. पण विनेश बाहेर पडल्यावर संपूर्ण देश दु:खी होता आणि आयटी सेलचे लोक आनंद साजरा करत होते."
 

Web Title: Vinesh Phogat joins Congress says feeling proud standing with every women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.