कुस्तीपटू विनेश फोगाटने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान तिला माहेर की सासर... नेमक्या कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विनेशने दोन्ही गोष्टी तिच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असं सांगितलं. तसेच एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी आहे असंही म्हटलं आहे.
विनेश फोगाटचं सासर हे बख्ता खेडा गावात आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघात बख्ता खेडा गाव येतं. विनेशचं माहेर बलाली गाव चरखी-दादरी विधानसभा मतदारसंघात येतं. ती निवडणूक लढवणार हे निश्चित मानलं जात आहे. या दोनपैकी कोणत्याही एका जागेवरून काँग्रेस तिला उमेदवारी देऊ शकते.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश फोगाट म्हणाली की, "सर्वप्रथम, मला कुस्तीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल मी देशातील जनतेचे आभार मानू इच्छिते. मला आशा आहे की, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन. मी काँग्रेस पक्षाची खूप आभारी आहे. वाईट काळात आपलं कोण आहे हे समजतं."
विनेश फोगाटने सांगितलं काँग्रेसमध्ये जाण्याचं कारण
"आज मला खूप अभिमान वाटतो की, मी अशा पक्षात आहे जो महिलांसाठी रस्त्यांपासून संसदेपर्यंत लढायला तयार आहे. जेव्हा आम्हाला रस्त्यावरून फरफटत नेलं जात होतं, तेव्हा भाजपा सोडून सर्व पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आजपासून मी नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. जी लढाई सुरू होती ती सुरूच आहे, ती लढाई आपण जिंकू. आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही" असं विनेशने म्हटलं आहे.