हरयाणा निवडणूक: विनेश फोगाटच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून ३१ जणांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:03 PM2024-09-06T23:03:58+5:302024-09-06T23:05:12+5:30

Haryana Assembly Election 2024: अखेर विनेश फोगाटची उमेदवारी निश्चित झाली असून, हरयाणा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे.

vinesh phogat to contest from julana congress releases first list of candidates for the haryana assembly elections 2024 | हरयाणा निवडणूक: विनेश फोगाटच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून ३१ जणांची यादी जाहीर

हरयाणा निवडणूक: विनेश फोगाटच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; काँग्रेसकडून ३१ जणांची यादी जाहीर

Haryana Assembly Election 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे वजन जास्त असल्यामुळे महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपीलही करण्यात आले होते. परंतु, विनेश फोगाटसंदर्भातील दावा फेटाळण्यात आला. भारतात आल्यावर विनेशचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेतील नोकरीचा राजीनामा देऊन विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ३१ जणांची यादी जाहीर केली असून, विनेशच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वीच विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले. यानंतर लगेचच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच केसी वेणूगोपाल यांची भेट घेतली. विनेशला काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होते. परंतु, कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झालेले नव्हते. आता काँग्रेसने जाहीर केलेल्या ३१ जणांच्या यादीतून ही बाबही स्पष्ट झालेली आहे. 

जुलानामधून विनेश फोगटला उमेदवारी

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जुलानामधून कुस्तीपटू विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे. भूपेंद्र सिंह हुडा यांना गढी सांपला-किलोई, राव दान सिंह यांना महेंद्रगड, आफताब अहमद यांना नूह, उदय भान यांना होडल आणि बदलीमधून विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे. विनेशला उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघातील लढत रंजक बनल्याचे सांगितले जात आहे. सन २०१९ मध्ये JJP नेते अमर जीत दांडा यांनी निवडणूक लढवली होती. अमर जीत दांडा यांना ६१ हजार ९४२ मते मिळाली होती. तर याच मतदारसंघात भाजपा उमेदवाराला ३७ हजार ७४९ मते मिळाली होती. जेजेपी उमेदवार अमर जीत दांडा विजयी झाले होते. 

दरम्यान, काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बजरंग पुनियाला तत्काळ प्रभावाने अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. तर दुसरीकडे, जेव्हा आम्हाला रस्त्यावरून फरफटत नेले जात होते, तेव्हा भाजपा सोडून सर्व पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. मी नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. जी लढाई सुरू होती ती सुरूच आहे, ती लढाई आपण जिंकू. आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही, असे विनेशने काँग्रेस प्रवेशावेळी म्हटले.
 

 

Web Title: vinesh phogat to contest from julana congress releases first list of candidates for the haryana assembly elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.