नवी दिल्ली ( Marathi News): कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने पुरस्कार घेऊन जात असताना विनेश फोगाटला पोलिसांनी रोखले. त्यानंतर विनेश फोगाटने कर्तव्य मार्गावरील बॅरिकेड्सवर आपला पुरस्कार ठेऊन माघारी परतली.
पुरस्कार परत करण्यापूर्वी विनेश फोगट म्हणाली की, हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे, असं मतही व्यक्त केलं. विनेश फोगाट पुरस्कार परत करताना भावूक झाल्याचे देखील दिसून आले.
बजरंग पुनियाने नुकतेच पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्यानंतर आता विनेश फोगाट यांनी दोन पुरस्कार परत केले. २२ डिसेंबर रोजी बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. बजरंग पुनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत असल्याचे बजरंग पुनिया म्हणाला.