Haryana Assembly Elections 2024 : चरखी दादरी : हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे (Haryana Assembly Elections 2024) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तिकिट वाटपावरून नाराज भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करणं सुरू केले आहे. तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) आज दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
अशा परिस्थितीत विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कुस्तीपटू विनेश फोगट शुक्रवारी नवी दिल्लीत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या काँग्रेस विनेश फोगट हिला तीनपैकी एका जागेवर निवडणूक लढण्यास तिकीट देऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे. यामध्ये चरखी दादरी, बाढ़ड़ा आणि जिंद मतदारसंघाचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान, विनेश फोगटने दोन मतदारसंघातून मला उमेदवारी द्या, अशी विनंती काँग्रेस नेतृत्वाला केल्याचे म्हटले जात आहे. त्या जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नव्हते. त्यामुळे विनेश फोगटला तिथे उमेदवारी देण्यात काँग्रेसला फारशी अडचण येणार नाही. विनेश फोगट हिचे सासरचे घर सोनिपत येथे आहे, तर तिच्या माहेरचे घर चरखी दादरी येथे आहे. अशा परिस्थितीत विनेश फोगटला कोणत्या जागेवरून उमेदवारी द्यायची यावर काँग्रेस चर्चा करत आहे.
बजरंग पुनियाही निवडणूक लढवू शकतोदुसरीकडे, स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्लीत दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसकडून बजरंग पुनियाला सोनीपत जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले जाणार असल्याची शक्यता आहे.