ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडमध्ये नाव, पैसा, प्रसिद्धी कमावल्यानंतर अनेकजण दुसरा पर्याय म्हणून राजकारणात नशीब आजमावतात. पण फार कमी जणांना त्यामध्ये यश येते. विनोद खन्ना हे बॉलिवूड इतकेच राजकारणातही यशस्वी ठरले. चित्रपटसृष्टीतील 29 वर्षांच्या यशस्वी करीयरनंतर विनोद खन्ना यांनी 1997 साली राजकारणाच्या पीचवर प्रवेश केला.
1997 साली त्यांनी भाजपाच्या तिकीटावर पंजाबच्या गुरदासपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात जनतेने त्यांना निवडून लोकसभेवर पाठवले. पुढे 1999, 2004 लोकसभा निवडणुकीतही गुरदासपूरमधून त्यांची विजयाची मालिका कायम राहिली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकीत पुन्हा गुरदासपूरमधून निवडून ते लोकसभेवर गेले.
1999 ते 2004 या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले. जुलै 2002 मध्ये त्यांना सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री बनवण्यात आले. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली. राजकारणातील विनोद खन्ना यांचा आलेख पाहिला तर, ते फक्त बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरचे हिरो नव्हते तर, लोकांचा विश्वासही त्यांनी जिंकला होता.