नवी दिल्ली - चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली होती. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, १९ नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात केजरीवाल यांच्या आपला यश मिळालं नाही. त्यामुळे, चंदीगडमध्ये सर्वात मोठा पक्ष असतानाही आम आदमी पक्षाचा महापौर झालाच नाही. येथे भाजप नेते विनोद तावडेंच्या प्रभारी नेतृत्वात भाजपचा महापौर बनला.
भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. तावडे यांच्या नेतृत्वात भाजपला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी महापौरपदी भाजप नेत्याला बसविण्यात तावडेंनी यश मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महापौर निवडीचा परिणाम पंजाबच्या आगामी निवडणुकांवरही दिसेल, असेही ट्विटमध्ये तावडेंनी म्हटले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे सात आणि अकाली दलाचा एक असे आठ नगरसेवक तटस्थ राहिले. निवडणुकीत काँग्रेसची कोंडी झाली. कारण भाजपला हरविण्यासाठी ते `आप`ला मतदान करू शकत नव्हते. भाजपचे तेरा नगरसेवक होते. पण तेथील भाजपच्या खासदार किरण खेर या महापालिकेच्याही सदस्य असतात, असा नियम भाजपने दाखवला. त्यामुळे भाजपला तेरा सदस्य निवडून आलेले असताना चौदा मते मिळाली
मतदारांनी काँग्रेसलाही नाकारले
चंदीगडमध्ये महापालिका निवडणुकंसाठी २४ डिसेंबरला मतदान झाले व ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या तुलनेत आपचे उमेदवार अनुभवी नव्हते तरीही मतदारांनी दोन्ही मोठ्या पक्षांना नाकारून ‘आप’वर विश्वास टाकला. विशेष म्हणजे भाजपचे महापौर रविकांत शर्मा यांचा या निवडणुकीत पराभव झाला.