इंडिया आघाडीला जन्म देणाऱ्या नितीशकुमारांनीच भाजपाच्या पारड्यात उडी मारल्याने विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा होती, ती आता खरी होत आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाच्या ओसरीला जाऊन बसणार आहेत. आज रात्रीपर्यंत नितीश कुमारांच्या सरकारला भाजपाचे समर्थन पत्र दिले जाणार आहे. उद्या नितीशकुमार भाजपाच्या साथीने सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
नितीश कुमारांनी भाजपासोबत निवडणूक लढविली होती. परंतू, काही काळातच त्यांनी भाजपासोबत बिनसल्याने लालूंच्या राजदसोबत सत्ता स्थापन केली होती. मागील सरकारमध्ये देखील नितीश कुमार आणि राजद यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. परंतु, लालुंच्या पुत्रांवर टीका करत नितीशकुमार यांनी भाजपाचा हात धरला होता. आता पुन्हा एकदा नितीश यांनी भाजपाचा आसरा घेतला आहे. महत्वाचे म्हणजे मोदींविरोधात इंडिया आघाडी स्थापन करण्यास नितीशकुमार यांनीच पुढाकार घेतला होता.
दरम्यान, भाजपा आमदारांच्या सहीचे पत्र नितीशकुमारांना दिले जाणार आहे. आधीच्या फॉर्म्युल्यानुसारच मंत्रिपदे वाटली जाणार आहेत. सरकार बनविण्याचा फॉर्म्युला २०२० चाच राहणार आहे. यामध्ये भाजपाकडे विधानसभा अध्यक्ष आणि दोन उपमुख्यमंत्री पदे राहणार आहेत. तर मुख्यमंत्री पद स्वत: नितीशकुमार यांच्याकडे राहणार आहे, असे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
भाजपची दिल्लीत खलबते...
बिहार भाजप नेत्यांची दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत झालेली बैठक पूर्णपणे बिहारमधील राजकीय घडामोडींवर केंद्रित होती, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांमध्ये जेडीयूशी हातमिळवणी करण्याबाबत फायद्या-तोट्याची चर्चा झाली. दोन उपमुख्यमंत्रीपदासाठी रेणू देवी या आघाडीच्या दावेदार आहेत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर पक्ष अजूनही विचार करत आहे.
विनोद तावडे पाटण्यात...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज बक्सरला पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेही दिसले आहेत. दरम्यान, भाजप नेते राधामोहन सिंह बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले आहेत. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे देखील पाटण्याला पोहोचले आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर टीका केली आहे. ही यात्रा इंडिया आघाडीला तोडणारी ठरणार आहे, असे ते म्हणाले आहेत.