नवी दिल्ली : भारतीय हद्दीत घुसखोरीचा चीनचा डाव भारतीय जवानांनी उधळताच चवताळलेल्या ड्रॅगनने ईशान्य लद्दाखमधील रेझांग ला जवळ भारताच्या दिशेने हवेत गोळीबार करून गेल्या ४५ वर्षांपासून अबाधित कराराचे उल्लंघन केले.
सोमवारी मध्यरात्री चिनी सैनिकांचा ईशान्य लद्दाखच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी पुन्हा हाणून पाडला. सैरभैर झालेल्या सैनिकांनी जवानांच्या दिशेने हवेत गोळीबार केला. तेव्हापासून सीमेवरील तणावात भर पडली आहे. कराराचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच भ्याड चीननेभारतीय जवानांनीच आमच्या दिशेने हवेत गोळीबार केल्याचे रडगाणे गायले. लष्कराने हे आरोप फेटाळले.
ड्रॅगनची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठी भारताकडून ईशान्य लद्दाख, अरुणाचल प्रदेशातील सीमाभागात जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. चुशूल सब सेक्टरमध्ये रेझांग ला पोस्टमध्ये सोमवारी ही घटना घडली. स्वहद्दीतून पीएलए सैनिकांनी तेथून भारताकडे गोळीबार केला. जीवितहानी झाली नसली तरी चीनचा युद्धखोरीचा कांगावा समोर आला आहे. मंगळवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणातच चुशूलमध्ये दोन्ही बाजंूच्या कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
तत्पूर्वी, चीनच्या वेस्टर्न कमांडने भारतावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे लष्कराने म्हटले आहे. ईशान्य लद्दाखमधील पँगाँग त्सो सरोवरानजीक दोन्ही बाजूचे शस्त्रसज्ज सैनिक आमनेसामने आहेत. सरोवरानजीक असलेल्या प्रमुख हिमशिखरांवर चीनला ताबा मिळवायचा असून भारतीय जवान त्यांचा हा कट उधळून लावत आहेत. रेजाँग लॉ नजीक स्वहद्दीत चिनी सैनिकांनी ठाण मांडले असून भारतीय जवानही त्यांचा सामना करीत आहेत.
संबंध बिघडतील, अशी दिली गेली चीनकडून धमकी
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झुओ लिजियान यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली. भारतानेच चिथावणी दिली, जवानांनी गोळीबार केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडतील व त्याची जबाबदारी भारतावर असेल. पीएलएच्या ईस्टर्न कमांडनेदेखील असेच पत्रक प्रसिद्ध केले.
भारतीय लष्कराने हे आरोप फेटाळले. भारताकडून प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, आमच्या हद्दीच्या दिशेने तुमचे जवान सरकत होते. त्यांना आम्ही रोखले. स्वत:च्या सैनिकांना चिथावण्यासाठी तुम्हीच गोळीबार केलात. त्याही स्थितीत जवानांनी संयम दाखवला व अत्यंत जबाबदारीने स्थिती हाताळली.