नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. सोमवारी पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील अधिकारी शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे.
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात सुभेदार सुखदेव सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. पाकिस्तानी रेंजर्सने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सोमवारी सायंकाळी सीमारेषेवर गोळीबार केला होता. त्यामध्ये, सुखदेव सिंह शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारास भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, पुलवामा सेक्टरमध्येही दहशवादी आणि सीआरपीएफ जवानांची चकमक झाली होती. त्यामध्ये, दोन जवांनाना वीरगती प्राप्त झाली आहे.
गेल्या आठवड्यात एलओसीवर पाकचा गोळीबार
पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गुरुवारी सकाळी गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन जवान शहीद झाले होते, तर अन्य चार जण जखमी झाले होते. या जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पुलवामा येथे दोन जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पम्पोरमधील कांधीजल ब्रिजवर सीआपीएफच्या ११० बटालियनचे जवान आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस रोड ओपनिंग ड्युटी (आरओपी) वर तैनात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. सध्या हा परिसर सुरक्षा रक्षकांनी घेरला असून शोध मोहीम सुरु आहे.