नवी दिल्ली : एका मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या एका २२ वर्षीय आरोपीस तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावतानाच असे प्रकार म्हणजे महिलेचे स्वातंत्र्य आणि तिच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे रविवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने म्हटले आहे.छेडछाड आणि पाठलाग करणे हा मौजमस्तीचा अतिशय हास्यास्पद व निंदनीय प्रकार आहे. हा महिलांच्या शारीरिक व मानसिक छळाचा प्रकार आहे. बहुसंख्य भारतीय महिलांना अशा समस्यांचा, अशा छळाचा सामना करावा लागतो. सार्वजनिक परिवहन, शॉपिंग मॉल वा मल्टिप्लेक्स यासह विविध सार्वजनिक ठिकाणी महिलांना अशा छेडछाडीला सामोरे जावे लागते, असे महान्यायदंडाधिकारी सुशील बाला डागर म्हणाले. छेडछाड ही एक सामाजिक समस्या बनली आहे. यामुळे महिला स्वत:ला असुरक्षित समजू लागल्या आहेत. त्याचमुळे घरातून एकट्या बाहेर पडताना अनेकजणी घाबरताना दिसतात. छेडछाड पूर्णत: एक सामाजिक गुन्हा आहे. छेड काढणे, अश्लील टिप्पणी करणे, अश्लील इशारे करणे, महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न या सर्व गोष्टी महिलांच्या जगण्याच्या अधिकाराला नख लावणाऱ्या आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
छेड काढणे जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन
By admin | Published: November 01, 2015 11:56 PM