नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याच्या तोंडावर राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणा-या चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, असे म्हटले.मल्टिप्लेक्स असोसिएशन आॅफ इंडियाने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आमचे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व गोवामधील सदस्य ‘पद्मावत’चे प्रदर्शन करणार नाहीत, असे जाहीर केले. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीजवळ अनेक ठिकाणचेराष्ट्रीय महामार्ग बुधवारी तात्पुरते अडवून ठेवले होते, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. इतर ठिकाणी निदर्शकांनी बस व चित्रपटगृहांची नासधूस केली, त्यामुळे चित्रपटगृहमालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर मंगळवारी अहमदाबादेत करणीसेनेने मेणबत्ती मोर्चा काढला.त्यानंतर लगेचच हिंसाचार व जाळपोळ झाली. अहमदाबादेतील अॅक्रोपोलीस, अहमदाबाद वन, हिमालय मॉल आणि सिनेमॅक्सवर हल्ले झाले. विशेष म्हणजे, या चित्रपटगृहाच्या मालकांनी आम्ही ‘पद्मावत’ दाखवणार नाही, असे जाहीर केले होते.गुरगावात गोयंका शाळेच्या बसवर हल्ला करण्यात आला. येथील आयनॉक्स चित्रपटगृहाला सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबईला जोडणा-या आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनजवळील किशनगंज (जिल्हा इंदूर) भागात पिगदांबर क्रॉसिंग जवळपास २०० निदर्शकांनी अडवून ठेवली होती व त्यांनी काचेच्या बाटल्या तेथे फोडून टाकल्या.जम्मूत थिएटर पेटवण्याचा प्रयत्न-जम्मूमध्ये निदर्शकांनी चित्रपटगृहाला पेटवून द्यायचा प्रयत्न केला. राजस्थानात चित्तोडगढनजीक बुधवारी सलग दुसºया दिवशी निदर्शने झाली.मथुरा-आग्रा रेल्वेमार्ग भुटेश्वर स्थानकात राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी बुधवारी जवळपासदहा मिनिटे अडवून ठेवला होता.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमच्या राज्यात पद्मावत प्रदर्शित झाल्यास आनंद वाटेल, असे म्हटले.
‘पद्मावत’विरोध झाला हिंसक,जनता संचारबंदीची घोषणा; करणी सेनेचे ठिकठिकाणी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:57 AM