कोलकाता - भाजपने पुकारलेल्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान काही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळीसह हिंसाचाराच्या घटना घडल्या. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चकमकीत दोन विद्यार्थी ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने बंदची हाक दिली होती. बंद यशस्वी झाल्याचा दावा करीत भाजपने दोन तासआधीच तो मागे घेतला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. भाजपच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बंदसमर्थकांनी उत्तर दिनाजपूरमधील राष्टÑीय महामार्ग बंद केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीमार केला.पश्चिम मिदनापोर, प. बर्धवान, दक्षिण आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल समर्थकांत चकमक झाली. मिदनापोर जिल्ह्यात बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली, तसेच वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यांवर टायर्स जाळण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. कोलकात्यात भाजप नेत्यांनी मोर्चा काढला, तर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मंत्रीही जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.मध्य कोलकात्यात पोलिसांशी झटापट करण्याऱ्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंद समर्थक हातीबगान भागात दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगत होते. पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे विभागातील काही मार्गांवर रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. इस्लामपूर येथे राज्य परिवहन मंडळाच्या तीन बसची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)दोघांच्या हत्येमागे भाजपच -ममतादोन विद्यार्थी चकमकीत ठार झाल्याच्या घटनेमागे भाजपच आहे. या मुद्यांवरून बंद पुकारून भाजप राजकीय फायदा लाटू पाहत आहे. बंददरम्यान भाजपने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.राज्यातील जनजीवन विस्कळीत करण्याचा भाजपचा बेत हाणून पाडल्याबद्दल त्यांनी प्रशासनाची प्रशंसाही केली. त्या इटलीच्या दौºयावर आहेत. बंद सपेशल अयशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपच्या बंगाल बंददरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:52 AM